Wikipedia

शोध परिणाम

सोमवार, २१ मार्च, २०२२

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आदिलशहाने मिळून शाहजी राजांचा हा मनसुबा उधळून लावला. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून काढुन आदिलशाहीच्या नव्यानेच जिंकलेल्या प्रांतात पाठवण्यात आले. तिकडे त्यांनी थोर पराक्रम करून यश संपादन केले परंतु होदेगिरी येथे अपघाताने त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या परमप्रतापी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करणार आहोत. मागे आपण पाहिलं आहे की शाहजी राजे निजामशाही सोडून निघाले तेव्हा त्यांच्या पाठलागासाठी त्यांचे सासरे लखुजी जाधवराव लागले, यावेळी शाहजी राजे कोकणातून घाटमाथ्यावर आले त्यावेळी जिजाबाई सात आठ महिन्याच्या गरोदर होत्या,त्यामुळे प्रवासाची दगदग होऊन धावपळीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून शाहजी राजांनी त्यांना आपले निकट असलेले शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार निवासराव यांच्याकडे ठेवले आणि त्यांच्या रक्षणासाठी काही निवडक माणसे ठेवली. त्या माणसांमध्ये बाळकृष्णपंत हनुमंते, रघुनाथ बल्लाळ कोरडे, शामराज नीलकंठ अशी नावे इतिहासात आढळतात. त्याच प्रमाणे जिजाबाईंच्या माहेरून आलेल्या लोकांत गोमाजी नाईक पानसंबळ हेही नाव आढळते. याप्रमाणे जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शाहजी राजे पुढे निघून गेले, पुढे लखुजी राजांची आणि जिजाबाईंची या किल्ल्यात भेट झाल्यावर त्यांनी जिजाबाईंना सिंदखेडला येण्यास सांगितले, परंतु जिजाबाईंनी त्यांना स्पष्ट नकार देऊन तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखुजींनी सुद्धा त्यांच्या रक्षणासाठी काही माणसे दिली. अशाप्रकारे जिजाबाई शिवनेरी किल्ल्यात राहू लागल्या. 
पुढे शिवाजी महाराजांच्या जन्माची वेळ जवळ आली आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ शुक्रवार या दिवशी अवघ्या भरतभूमी ला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वराज्याची स्थापना करणारा तेजसूर्य शिवनेरीवर जन्माला आला. आशा प्रकारे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म अत्यंत धावपळीच्या काळात पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर इ.सन १९ फेब्रुवारी १६३० त झाला. पुत्रप्राप्तीची वार्ता विजापुरास शाहजी राजांना कळवण्यात आली. जिजाबाईंना पुत्र प्राप्त झाल्याचा आनंद सर्व आश्रित मंडळींना झाला आणि त्यांनी आनंद साजरा केला. जिजाऊंनी देवीच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे मानून देवीच्या नावाने त्याचे नाव शिवाजी असे ठेवले. 

शिवरायांच्या जन्म तिथी वरून अनेक वाद सांगितले जातात. याबाबत इतिहासकारांत अनेक मतमतांतरे होती. चिटणीस बखर, शिवदिग्विजय यात वैशाख शुद्ध द्वितीय गुरुवार ही तिथी दिली आहे. तर रायरीच्या बखरीत शके १५४८ वैशाख शुद्ध पंचमी हि तिथी दिली आहे. परंतु या दोन्ही विश्वसनीय नसून अलीकडे शेडगावकर भोसले यांच्या घराण्यात सापडलेली बखर प्रसिद्ध झाली, त्यातील तिथी म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हीच विश्वसनीय आहे.याबाबत सर्व इतिहासकारांच एकमत झाले आहे. अशाप्रकारे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी शाहजी राजांनी मोगल,निजामशाही, आदिलशाही मुलुखात जी धामधूम उडवून दिली ती पुढे दहा वर्षे सतत चालली. यावेळी जिजाबाई आणि शिवाजीराजे हे याच जुन्नर पुणे भागात वास्तव्य करून होते, यावेळी त्यांचा मुक्काम काही काळ शिवनेरी किल्ल्यात तर काही काळ आसपासच्या मुलुखात होता. दरम्यानच्या काळात जिजाबाईंनी आपल्या विश्वासू माणसांच्या आणि कारकुनांच्या साहाय्याने शिवरायांचे संगोपन केले. त्यांना सुशिक्षण दिले. यावेळी शिवरायांनी लष्करी शिक्षण म्हणजेच घोड्यावर बसणे, तिरंदाजी करणे, बंदूक मारणे, पट्टा फिरवणे इ. युद्धोपयोगी कलांचा बराच अभ्यास केला. शाहजी राजांच्या तालमीत शिकलेल्या योद्ध्यांनी त्यांना यात तरबेज केले. यावेळी दादाजी कोंडदेव हे शाहजी राजांचे नोकर म्हणून या जागिरीचे काम सांभाळत होते. त्यांनी या जागिरीचे योग्य व्यवस्था लावली होती. पुढे जेव्हा शाहजी राजे विजापुरास स्थिर झाले, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जिजाऊ आणि शिवराय विजापुरास गेले तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा पुण्यास येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि शिवराय व जिजाऊ पुण्यास आले. यावेळी त्यांच्यासोबत शाहजी राजांनी अत्यंत विश्वासू माणसे कारकून म्हणून पाठविली त्यात शामराज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण पंत मुजुमदार, सोनोपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे सबनीस हे होत, अशाप्रकारे आपल्या पराक्रमी पित्यासोबत काही दिवस राहून शिवराय जिजाऊसोबत पुण्यास परत आले.

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

शाहजी राजांची आदिलशाहीतील नोकरी

 मागे आपण पाहिलं की, शहाजहानच्या प्रचंड मोठ्या सेनासागराशी झुंज देत असलेल्या शाहजी राजांना अपयश घेऊन आपल्या ताब्यातील मुलुख,किल्ले  शत्रूच्या स्वाधीन करून स्वतःला आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. त्यानुसार ते विजापुरास आले. यावेळी आदिलशहाने त्याच्या सरदारांनी, रणदुल्लाखान, मुरार जगदेव यांनी त्यांचा बहुमान केला. यावेळी मोगलांशी आदिलशहाच्या झालेल्या तहानुसार शाहजी राजांची पूर्वीची जहागीर पुणे, सुपे हे परगणे त्याने शाहजी राजांकडेच कायम केले. त्या परगण्यांची व्यवस्था पाहण्याचं काम शाहजी राजांनी दादाजी कोंडदेव नामक ब्राह्मणास दिले.आणि त्यांच्या पदरी एक हजर स्वार दिले. या स्वारांवर सिद्दी हिलाल याला प्रमुख म्हणून नेमले.

मुरार जगदेवाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता, शिवरायांनी पुणे पुन्हा बसवुन येथील लोकांची भीती घालवली, यावेळी सोन्याचा नांगर शेतात शिवरायांच्या हाताने फिरवला, यावेळी दादाजी कोंडदेव

    मोगलांकडून आदिलशहास भीमा व निरा या नद्यांमधला प्रांत मिळाला होता, आणि त्याची व्यवस्था लावण्याच्या कामी मुरारपंताने शाहजी राजांना बरोबर घेतले. मुरारपंतांना हे माहिती होते की या प्रदेशाची चांगली माहिती शाहजी राजांना आहे, त्यानुसार त्यांनी या प्रदेशाची व्यवस्था लावली, तेव्हा त्यावेळी मुरार जगदेव यांचा शाहजी महाराजांवर प्रचंड लोभ बसून त्याने आदिलशाहास त्यांची तारीफ केली आणि शिफारस केली कि, असा शूर, मुत्सद्दी, युध्दकलानिपुण पुरुषास सहसा सोडू नये. यानंतर शाहजी राजे विजापुरास जास्त राहिले नाहीत. कर्नाटकातील प्रांतात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी आदिलशहाने रणदुल्लाखानाची नेमणूक केली आणि त्याच्या मदतीस शाहजी राजांना पाठवले आणि शहाजी राजांना या कर्नाटक प्रांतात जहागीर देण्याचे कबूल केले. पुढील काही दिवसानंतर राजांनी या भागातील जमेदारांस नमवून हा प्रांत आपल्या ताब्यात आणला. त्यानुसार त्यांनी जे परगणे जिंकले होते ते त्यांची जहागीर म्हणून त्यांच्याकडेच ते कायम केले. याप्रमाणे रतनपूर, देवगड, कानकगिरी, व राजदुर्ग हे परगणे शाहजी राजांना जहागिरी दाखल मिळाले.

    यावेळी कर्नाटकद्रविड भागातील या नव्यानेच प्राप्त झालेल्या मुलुखाची व्यवस्था लावणे कठीण काम असल्याचे जाणून आदिलशहाने या कामात तरबेज असलेल्या आणि मलिक अंबरच्या तालमीतले असलेल्या शाहजी राजांना या भागाची सुभेदारी दिली. शाहजी राजांनी या भागातील बेबंदाई मोडून धामधूम नाहीशी करून जिकडेतिकडे चांगला बंदोबस्त केला. पुढे शाहजी राजांनी तंजावर प्रांत सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणला. 

    पुढे शिवाजी महाराजांनी चालवलेल्या धामधुमीत आदिलशहाने शाहजी राजांची शिवाजी महाराजांना फूस असल्याच्या संशयाने जिंजीच्या वेढयात असलेल्या शाहजी राजांना बाजी घोरपडे मुधोळकर आणि अफजलखान यांच्या करवी कैद केली. त्यांना विजापुरात आणले त्यावेळी शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या बादशाहशी पत्र व्यवहार करून आदिलशहावर दबाव आणून शाहजी राजांच्या प्राणावर आलेले हे संकट दूर केले. यानंतर शाहजी राजे विजापुरास चार वर्षे अडकून पडले आणि या काळात शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुखात कोणतीही धामधूम केली नाही. याप्रमाणे पुढे दरबारी लोकांची आणि आदिलशहा यांचा विश्वास संपादन करून शाहजी राजे पुन्हा कर्नाटकात आले.

    पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे चालवलेले प्रयत्न आणि त्यांचे मिळवलेले यश शाहजी राजांच्या कानी येत होते. परंतु त्यांना शिवाजी राजांनी भेट घेता येत नव्हती कारण शिवाजी राजांची ही सगळी धामधूम आदिलशाही मुलुखात होत होती. पुढे आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यात तह होऊन थोडी शांतता झाल्यावर शाहजी राजांनी स्वदेशी जाण्याची परवानगी आदिलशहकडून मिळवली. आणि मग शाहजी राजे आणि शिवाजी महाराज या थोर पिता पुत्रांची भेट इ.सन १६६२ मध्ये  जेजुरीत झाल्याचं म्हटलं जातं. यावेळी जिजाऊ, शिवराय, शाहजी राजे, तुकाऊ, व्यंकोजी राजे या सर्व कुटुंबाची एक समवेत भेट झाली. यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर शाहजी राजे कर्नाटकात परत आले.

फर्जंद शाहजी राजे यांची होदेगिरी (कर्नाटक) येथील समाधी

     अशा प्रकारे शाहजी राजे कर्नाटकात परत आल्यानंतर काही दिवसानंतर आदिलशाही मुलुखाच्या बंदोबस्ताच्या कामगिरीवर असता बेदनूर जवळ होदेगिरी म्हणून गाव आहे, तिकडे शिकारीवर असता घोड्याचा पाय वृक्षवेलीत अडकून शाहजी राजे घोड्यावरून पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी त्यांचे वय सत्तर वर्षांचे होते. इ.सन १६६४ च्या २३ जानेवारीत हे वृत्त घडले.

    याप्रकारे शाहजी राजांच्या मृत्यनंतर विजापूरकरांकडून  व्यंकोजी राजांचे सांत्वन होऊन मनसबदारीची वस्त्रे त्यांना मिळाली.

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

पुन्हा उभारलेल्या निजामशाही तख्ताला संपवण्यासाठी मोगल बादशहा शाहजहान स्वतः दक्षिणेत उतरतो.

 मागील भागात आपण पाहिलं की, शहाजहानने पाठवलेल्या सैन्याचा शाहजी राजांनी दोन वेळा पराभव केला. त्याप्रमाणे शहाजहानने विजापूरकरांना धमकीचे पत्र पाठवले. त्यात त्याने असे सांगितले की शहाजीच्या सोबत तुम्ही जो निजामशाही मुलुख घेतला आहे, तो परत करावा आणि शाहजीला कोणतीही मदत करू नये, आणि असे न केल्यास आम्ही फौजेसह तुमच्यावर चालून येऊ. परंतु रणदुल्लाखान वगैरे विजापुरी मंडळींनी शाहजी राजांच्या बाजूनेच राहणे पसंत केले. 

किल्ले माहुली

     वरील सर्व घडामोडी झाल्यानंतर आदिलशहाने शाहजी राजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेलतेला पाहून शहाजहानने आपल्या सैन्याचे चार भाग केले, त्याने दोन तुकड्या शाहजी राजांवर तर दोन तुकड्या आदिलशहावर पाठवल्या. याप्रमाणे शाहजी राजांच्या कब्जातील सोलापूर ते बेदर आणि कोकणपट्टी पूर्ण शत्रूच्या ताब्यात गेली. यावेळी शाहजी राजे अहमदनगर कडे वळाले. तिकडून त्यांनी मोगलांशी कडवा प्रतिकार केला, त्यांनी यावेळी प्रचंड युद्ध कौशल्य दाखवले. पण शत्रू सैन्य जास्त असल्याने त्यांनी कोल्हापूर कडे धाव घेतली. आणि तिकडे त्यांना विजापुरी सैन्याची साथ भेटून त्यांनी मोगलांची गनिमी कावा पद्धतीने लंगडेतोड चालू केली.

    आशा प्रकारे शाहजी राजे या प्रांतातून तिकडे तिकडून इकडे पळून आणि गनिमी काव्याचा वापर करून लढत राहिले. या सगळ्या धामधुमीत मोगलांच्या सैन्याची प्रचंड खराबी झाली.

    तेव्हा शहाजहानने आपल्या सैन्याला आदेश दिला की, शहाजीच्या मागे लागून आपल्या सैन्याचे खुप नुकसान होते आहे. त्यानुसार त्याच्या फौजेचा मोर्चा विजापुरकडे वळला. आणि मग या एकत्र सैन्याने विजापुरी मुलुखात धामधूम सुरू केली. मोगलांनी विजापुरी प्रांतातील बरेच किल्ले घेतले, प्रांत काबीज केले, शहरे ताब्यात घेतली.

    अशाप्रकारे मोगली सैन्य विजापुरी प्रांतात घुसलेले पाहून आदिलशहाने घाबरून जाऊन मोगलांशी तह केला आणि आपल्यावर आलेले संकट थांबवले. त्याप्रमाणे मोगल आणि आदिलशाह यांनी निजामशाही प्रांत आपापसांत वाटून घेतला, यानंतर मोगलांनी विजापुरकरांना अशी अट घातली की, शाहजी राजे त्यांच्या ताब्यातील सगळे किल्ले , प्रांत मोगलांना देतील तरच त्यांना व त्यांच्या लोकांना शाहजहान माफ करेल, विजापूरकरांनी त्यांना  कोणत्याही प्रकारची मदत किंवा थारा देऊ नये.अशाप्रकारे मोगल आणि विजापूरकर यांच्यात इ.सन १६३६ त तह झाला.

    या तहानंतर मोगलांचा संपूर्ण सेनासागर एकट्या शाहजी  राजांच्या मागे लागला. त्यात मोगलांना विजापुरी सैन्याने मदत केली. दरम्यान या मधल्या काळात शाहजी राजे कोकणात उतरून आपल्या हाताशी असलेला मुलुख स्थिरस्थावर करून माहुली किल्ल्यात राहिले. परंतु मोगलांची फौज प्रचंड असल्याने त्यांचा नाईलाज होऊन त्यांनी किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला आणि मोगलांना आपण केलेल्या सर्व  अपराधांची क्षमा करून मला आपल्या नोकरीत घ्यावे असा अर्ज केला. त्याप्रमाणे मोगल बादशाहने असा जबाब पाठविला की तुम्हाला पूर्वी मन्सब दिली असता तुम्ही बंड करून दिल्लीपदपातशाहीच्या विरोधात गेलात तेव्हा पुन्हा तुम्हाला आमच्या पदरी नोकरी मिळणे नाही, पण तुम्हाला विजापूरकरांच्या नोकरीस राहण्याची परवानगी आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली

 असा जबाब मिळाल्यावर त्यांनी माहुली किल्ल्यावर बसवलेल्या बालराजास बादशाहच्या स्वाधीन करून आपण स्वतः विजापुरास गेले. या सर्व घडामोडी इ सन १६३६ मध्ये घडल्या.

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

शाहजी राजे निजामशाही तख्ताची पुनर्स्थापना करतात.

 मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं कि, शहाजहानने इ. सन १६३३ त निजामशाही राज्य जिंकण्यासाठी मोहबतखानाला निजामशाहीवर फौज घेऊन पाठवले. त्याप्रमाणे फत्तेखानाला नमवून आणि त्यांच्या कब्जातील मुलुखावर विजय मिळवून मोगली फौजा शांत झाल्या. दरम्यान या मोहिमेत शाहजी राजांनी मोगली फौजेवर वेळोवेळी छापे घालून त्यांना हैराण करून सोडले आणि विजापूरकर सैन्यासोबत शाहजी राजांना सुद्धा हार खावी लागली.

शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम(शाहजहान)

     मागे सांगितल्या प्रमाणे शाहजी राजे आणि विजापूरकरांच्या फौजा हार घेऊन दौलताबादेतून मागे फिरल्या. त्यांच्या सोबत परत येताना शाहजी राजांनी पराभवाने खचून न जाता आपल्या हातातील सैन्य जमवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मोगलांच्या ताब्यात गेलेला पुणे, चाकण, बालाघाट पर्यंतचा प्रदेश कब्जात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मोगलांची अनेक ठाणी उठवली. याच सुमारास शाहजी राजांनी विचार केला की, मोगलांनी घेतलेला मुलुख आपण पुन्हा घेतला तेव्हा आपल्यावर आता लवकरच त्यांची मोहीम होईल, त्यानुसार त्यांनी विजापूरकर आदिलशाही दरबारातील रणदुल्लाखान आणि मुरार जगदेव यांच्या मदतीने दरबाराचा पाठिंबा मिळवला. यानंतर त्यांनी निजामशाहीचा एक वंशज मूर्तिजा नावाचा दहा वर्षाचा मुलगा गादीवर बसवला आणि आपण स्वतः या राज्याचे वजीर झाले. यामुळे निजामशाही घराण्याचा अभिमान बाळगणारे सर्व देशमुख, जहागीरदार,वतनदार शाहजी राजांना सामील झाले. पुढे शाहजी राजांनी निजामशाही चा जो प्रदेश मोगलांनी घेतलेला तो आपण हस्तगत केला. या सगळ्या प्रसंगाची खबर शाहजहान ला लागताच त्याने शाहजीराजांचा बिमोड करण्यासाठी फौज पाठवली पण तिचा शाहजी राजांनी  पार धुव्वा उडवला नंतर त्याने दुसरे सैन्य पाठवले त्याचीही तीच अवस्था झाली. यानंतर शहाजहानच्या लक्षात आलं की आपला निजामशाही बुडवल्याचा भ्रम होता, उलट पूर्वीच्या शत्रूपेक्षा अधिक बळकट शत्रूशी आता आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे चिडून जाऊन शहाजहानने ठरवले की आता शाहजी राजांना आणि आदिलशाह, कुतुबशहा या यावनी राज्यांचा सुद्धा बिमोड करायचा. त्यानुसार तो पिसाळलेल्या चित्त्याप्रमाणे दक्षिणेवर चालून आला.

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

शाहजी राजे मोगलांकडे....

 शहाजहानला शाहजी राजांच्या युद्धकुशल गुणांची ओळख होतीच. शिवाय निजामशाही बुडवण्यासाठी आपल्याला शाहजी राजांसारख्या नेतृत्वाची मदतच होईल असे समजून त्याने शाहजी राजांना पाच हजाराची मन्सब आणि निजामशाही कडून त्यांना आधी मिळालेला मुलुख कायम केला. या सगळ्या घडामोडी इ सन १६३० त घडल्या. अशाप्रकारे शाहजी राजे मोगलांच्या नोकरीत गेले. पुढे अशी काही कारणे घडली की त्यांनी मोगलांची नोकरी सोडली आणि पुन्हा स्वतंत्र अंमल चालवून राहिले.



        या सगळ्या काळात निजामशाही दरबारात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निजामशाही मुलुखात सारख्या मुघलांच्या धामधुमी चालू असल्यामुळे आणि या काळात दुष्काळ, रोग वगैरे आल्यामुळे सरकारी वसूलात मोठी कमी आली होती.  शिवाय मोगलांनी आपल्या मोठ्या मोठ्या सरदारांना फितवुन आपल्या बाजूने वळवुन निजामशाही खिळखिळी करुन सोडली होती. याच सगळ्या गदारोळात निजामशहा बादशाहने आपल्यावर आलेल्या या संकटाना आपला वजीर तकरीबखान कारणीभूत आहे असे समजून त्याला पदावरून कमी करून कैदेत टाकले. आणि फत्तेखानाला कैदेतून सोडून पुन्हा वजीर पद दिले. अशाप्रकारे निजामशाही दरबारात अधिकारांतर झाले.
     फत्तेखानाच्या हातात पुन्हा अधिकार आल्यावर त्याने पूर्वग्रह मनात ठेवून निजामशहास वेड लागल्याचे पसरवून त्याला लवकरच गळफास देऊन ठार मारले. त्याचा दहा वर्षाचा मुलगा त्याने गादीवर बसवला. त्याने निजामशहाच्या पक्षास असलेल्या सरदारांची सुद्धा कत्तल केली. या सगळ्या घटना इ सन १६३२ त घडल्या.
     यानंतर त्याने शहाजहान बादशहास आपण मुघलांचे अंकित होऊन राहू इच्छित आहोत असे पत्र पाठवले. शहाजहानला त्याचा मनसुबा लक्षात आला यावेळी बरेच  निजामशाही परगणे त्याच्या ताब्यात आले होते. त्यामुळे त्याने असा निरोप पाठवला की, निजामशाही खजिन्यातील सर्व मूल्यवान जवाहीर आणि उत्तम हत्ती आमच्याकडे पाठवा. तरच तुम्हाला आणि तुमच्या बालराजाला  मान्यता देऊ आणि काही मुलुख जहागिरी दाखल देऊ तेव्हा ही मागणी फत्तेखानाला मान्य झाली नाही, त्याप्रमाणे शहाजहानने त्याच्यावर सैन्य पाठवले. तेव्हा घाबरून जाऊन फत्तेखानाने त्याचे म्हणणे मान्य केले.आणि त्याप्रमाणे फत्तेखानाला जहागीर मिळाली. या जहागिरीत शाहजी राजांचा पूर्वीचा मुलुख होता, त्यामुळे मोगलांचा हा निर्णय त्यांना पसंत वाटला नाही, त्यामुळे त्यांनी मोगलांची नोकरी न करता स्वतंत्र होण्याचा विचार  केला ,त्याप्रमाणे त्यांनी निजामशाहीतील मुलुख नाशिक,त्र्यंबक,संगमनेर,जुन्नर,उत्तर कोकणचा काही भाग आपल्या कब्जात आणायला सुरुवात केली.
    हे सर्व घडत असताना शाहजी राजांनी मुरार जगदेवाशी बोलणे करून आदिलशहास आपल्या बाजूने करून घेतले आणि निजामशाहीतील मुलुख आणि किल्ले घेण्यासाठी त्यांच्या सैन्याची मदत मिळवली. अशाप्रकारे शाहजी राजे आणि मुरार जगदेव हे दोघे 
दौलताबादच्या किल्ल्यावर चालून गेले. हे चालून गेलेले पाहून फत्तेखानाने मुगलांचा सुभेदार मोहबतखान याला मदतीला बोलावले त्याप्रमाणे त्याची कुमक फत्तेखानाला मिळाल्याने किल्ला यांना लढून जिंकता येईना. मग त्यांनी भेद करून किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केले आणि फत्तेखानाला आपल्या बाजूने केले त्याप्रमाणे फत्तेखानाने मोगलांशी डाग करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे विजापूरकर आणि शाहजी राजे आणि किल्ल्यावरून फत्तेखान यांनी एकत्र मुघलांच्या छावणी वर हल्ला केला. पण मुघलांपुढे यांची एकही न चालून किल्ला मुघलांनी काबीज केला. याप्रमाणे फत्तेखानाला मुघलांनी शरण आणून त्यांने बसवलेल्या बालराजला कैदेत टाकून निजामशाही खालसा केल्या प्रमाणे झाले. या सर्व घडामोडी इ. सन १६३३ त घडले. यावेळी निजामशाही पूर्ण नष्ट केली असे जरी शहाजहानास वाटत असले तरी पुढे लवकरच शाहजी राजांनी तीची पुनर्स्थापना केली.

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

फर्जंद शाहजी राजे

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजे माहुली किल्ल्यातून सुटून आदिलशाही सरदार रणदुल्लाखान आणि मुरार जगदेव यांच्या मदतीने राहिले. ते परिंडा किल्ला आणि आजूबाजूचा मुलुख आपण हस्तगत करून स्वतंत्र पणे राहिले. दरम्यान निजामशाहीचा वजीर असलेला मुत्सद्दी मलीक अंबर मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा फत्तेखान हा वजीर झाला. फत्तेखान हा मलीक अंबरचा पुत्र जरी असला तरी बापासारखा धोरणी किंवा हुशार नसून गर्विष्ठ आणि क्रूर होता. मोठ्या मोठ्या सरदारांना वागवून घेण्याची आपल्या बापाची पद्धत त्याच्यामध्ये बिलकुल नव्हती. यानेसुद्धा मोगलांशी काही वेळ युद्ध चालवले पण त्यात त्याला यश आले नाही आणि मोगलांचा सरदार खानजहान लोदी याच्याशी त्याने तह करून मुलुखात शांतता राहील असे प्रयत्न केले. त्यामुळे निजामशाहीचा थोडा वेळ निभाव लागला होता.
    दरम्यान मूर्तिजा निजामशहाला फत्तेखानाचा शिरजोरपणा सहन न होऊन त्याने त्याला अधिकार पदावरून बाजूला करून तकरिबखानाला वजिरी दिली आणि फत्तेखानाला कैदेत केले. यानंतर निजामशाहीत अधिकारांतर झाले आणि हे पाहून लखुजी जाधवरावांनी पुन्हा निजामशाहीत येण्याविषयी बोलणे लावले. तेव्हा मूर्तिजा निजामशाहाने त्यांचे बोलणे प्रत्यक्ष ऐकायचे आहे असे सांगून त्यांना दरबारात भेटायला बोलावले, त्याप्रमाणे ते आणि त्याचा मुलगा अचलोजी असे दोघे (काही इतिहासकार सांगतात की त्यांचा अजून एक मुलगा आणि नातू या हल्ल्यात मारले गेले) दरबारात गेले. परंतु मूर्तिजा निजामशहा हा खुनशी मनुष्य असल्याकारणाने त्याने त्यांच्या मागच्या गोष्टींचा सूड म्हणून आधीच ठरविल्याप्रमाणे दरबारातुन उठून जाऊन त्यांचा खून करवला.
    आपल्या सासऱ्याला दग्याने असे ठार मारल्याचे वर्तमान शाहजी राजांना कळले तेव्हा ते परींडा किल्ल्यात होते. त्यांच्यात आणि जाधवरावांच्यात वैर जरी असले तरी त्यांचा अश्या पद्धतीने खून झाल्याने शाहजी राजांना फार दुःख झाले. दरम्यान त्यांनी संगमनेर पासून ते पुण्यापर्यंतचा सगळा मुलुख आणि किल्ले आपल्या कब्जात आणून स्वतंत्र अंमल चालविला होता. निजामशहा हा खुनशी आणि घातकी मनुष्य आहे त्यामुळे त्याच्याशी सख्य करून आपले नुकसान होईल हे त्यांना कळले होते. वर सांगितलेल्या धामधुमीत त्यांनी विजापुरी मुलुखावर सुद्धा हल्ले केले करून त्यांचा काही भाग काबीज केला होता. त्यामुळे आदिलशाही दरबारात घडामोडी होऊन त्यांनी मुरार जगदेवाला मोठे सैन्य देऊन शाहजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले . शाहजी राजांकडे या तेव्हा मोठ्या सैन्याशी लढता येईल अशी ताकद नव्हती. त्यामुळे ते आजूबाजूच्या मुलुखात पळत राहिले. मुरार जगदेवाने पुणे, इंदापूर वगैरे राजांच्या मुलुखात जाळपोळ सुरु केली आणि मुलुख बेचिराख करून टाकला . पुढे ही वावटळ शांत झाल्यावर शाहजी राजे पेमगडावर जाऊन राहिले. तिथे राहून त्यांनी सैन्याची पुन्हा जमवाजमव करून हातचा गेलेला मुलुख आणि किल्ले परत मिळवले. दरम्यान मोगलांचा सरदार खानजहान लोदी हा मुघल बादशाहची इतराजी होऊन दक्षिणेत येऊन निजामशहाच्या मदतीने राहिला होता. निजामशाहीतील देशमुख आणि जहागिरदारांनी त्याच्या बाजूने लढून मोगलांशी युद्ध सुरू केले होते. पुढे शहाजहान ने मोठी फौज पाठवून खानजहान लोदी सह निजामशहास नमवले. हे मोगली वावटळ इथून पुढे आपल्यावर येणार हे ओळखून शाहजी राजांनी मोगलांना त्यांच्याकडे नोकरी करण्याची तयारी असल्याचे कळवले. 
    
    

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

 निजामशाहीतील नोकरी

फर्जंद शहाजी राजे
मालोजी राजांच्या मृत्यू नंतर शहाजी राजांच्या ताब्यात मनसबदारी आली त्यावेळी निजामशाही राज्याचा कारभार मलीक अंबर याच्या हातात होता. मुघल बादशहा अकबर याने निजामशाही राज्य संपवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पण मलीक अंबर याने निजामशाही राज्य सावरले होते. त्याने लोकांची जुट करून निजामशाही तक्तावर निजामशहाच्या वारसदार मुर्तुजा निजामशहा बसवला. निजामशाही राजधान दौलताबाद अहमदनगर मुघलांच्या ताब्यात गेली होती. या सर्व घडामोडी इ.सन १६०० मध्ये घडल्या होत्या. दरम्यान निजामशाही मुलुख म्हणजे गुजरात पासून तर अहमदनगर पर्यंतचा सगळा मुलुख जो मुघलांनी घेतला होता तो मलीक अंबर आणि मिआन राजू यांनी त्यांच्याकडून परत मिळवला. पुढे मलीक अंबरने दौलताबाद जवळ खडकी नावाचे शहर बसवुन तेथे निजामशाही तख्त नेले. मलीक अंबर मोगलांचे काहीच चालू देई ना तेव्हा जहांगीरने आपला मुलगा शहाजहान यास इ. सन१६१७ त पाठवले, आणि त्या पाठोपाठ आपण स्वतःही निजामशाही वर चालून आला. या प्रचंड सेनेविरुद्ध मलीक अंबर ला हार खावी लागली असली तरी शहाजी राजांच्या अंगचे गुण यावेळी चांगलेच प्रकट झाले. त्यांनी वेळोवेळी छापे घालून मोगलांना हैराण करून सोडले. ते एक शूर सरदार आणि युद्धकुशल सेनानी आहेत याची सर्वांना खात्री पटली, मलीक अंबरचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसला.

निजामशाही सैन्याला मराठा सरदारांची चांगलीच साथ असलेली पाहून शाहजहानाने त्यांच्यात फितुरी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मलीक अंबाराशी ज्यांचे पटत नव्हते ते फितूर झाले. शहाजी राजांचे सासरे लखुजीराजे सुद्धा मोगलांना सामील झाले. पण शहाजी राजांनी निजामशाहीचा पक्ष सोडला नाही. या सगळ्या घडामोडीत निजामशाही मुलुख मोगलांनी घेतला तर शाहजहान दिल्लीस गेल्यावर त्याच्या कबज्यातील मुलुख मलीक अंबरने पुन्हा जिंकून घेतला अशी धुमश्चक्री चालू होती. पण पुढे मलीक अंबरने मोगलांशी लढाई करून मुलुखात शांतता राखण्यासाठी मोगलांशी संधी केली. त्या नंतर मोगल आणि निजामशाहीत फार जास्त लढाई झाली नाही. पुढे इ.सन १६२६ त आजाराचे काही कारण होऊन मलीक अंबर मृत्यमुखी पडला.
    मलीक अंबरच्या मरण पावल्यावर बादशाह जहांगीरच्या नंतर तख्तावर बसणार शहाजहान याने लखुजी जधावरावांच्या मदतीने निजामशाही संपूर्ण संपविण्याचा घाट घातला.मलीक अंबर याच्या मृत्यू नंतर मुर्तुजा निजामशहाच्या आईला विश्वासात घेऊन निजामशाही कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि पुढे मोगली फौजा दौलताबाद कडे आल्यावर। मूर्तिजा निजामशहा आणि त्याच्या आईला त्यांनी कोकणात कल्याण जवळील माहुली किल्ल्यात नेऊन ठेवले. या किल्याला मोगली सैन्याचा गराडा पडला पण शहाजी राजांनी त्यांना जरासुद्धा दाद लागू दिली नाही. पण पुढे लखुजीराजांनी निजामशहाच्या आईस वश करून  मिलाफाचे बोलणे लावले. त्यामुळे शाहजी राजांना फार वाईट वाटून त्यांनी किल्ल्यातुन निघून जाण्याचा विचार केला आणि ते वेढा फोडून बाहेर  माहुली किल्ल्याच्या बाहेर पडले.
शहाजी राजे माहुली किल्ल्यातुन बाहेर पडून देशाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सोबत जिजाबाई आणि मुलगा संभाजी  हे दोघेही होते. संभाजी यावेळी तीन चार वर्षाचे होते. जिजाबाई तेव्हा सात महिन्यांच्या गरोदर होत्या. या घोडदौडीमध्ये जिजाबाईंना धावपळीचा त्रास होऊन वेदना होऊ लागल्याने त्यांना शहाजी राजांनी सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी जुन्नर भागात असलेल्या शिवनेर किल्ल्यावर यांचे ठाणे होते. शहाजी राजे आणि यांचे सख्य होते. त्यामुळे जिजाबाई आणि संभाजी यांना काही निवडक माणसे सुरक्षेसाठी ठेऊन शहाजी राजे पुढे निघून गेले.
दरम्यान जाधवराव वगैरे लोक तिथे आल्यावर त्यांची आपल्या मुलीशी जिजाबाईशी भेट झाली. लखुजी रावांनी त्यांना आपल्या सोबत येण्याविषयी विचारले असता त्यांनी तिथेच राहण्याबद्दल सांगितले. आणि आपल्या पतीच्या विश्वासावर तिथेच राहण्याचा निर्धार केला. जाधवराव सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी काही माणसे ठेऊन स्वतः तिथून शहाजी राजांच्या पाठलागावर निघाले.
 शहाजी राजे यावेळी निसटले ते थेट विजापूरच्या वाटेवर. यावेळी मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान हे विजापूर दरबारातील मोठर सरदार होते.  शहाजी राजांच्या निजामशाही बुडू न देण्याच्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा होता. या दोघांना शहाजी राजांची योग्यता चांगलीच माहिती होती.

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास

शिवरायांचे पराक्रमी क्षत्रीय पूर्वज

शिवरायांचा जन्म सुर्यवंशीय क्षत्रिय कुळात झाला, इतिहासकार सांगतात की अयोध्या प्रांतात शिसोदे नावाचे सुर्यवंशीय राजे राज्य करीत होते. त्यांच्यातील एक पुरुषाने नर्मदा नदीतीरी जाऊन तिथे आपले राज्य संपादन केले. पुढे या राजाला दुसऱ्या राज्यांकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते मेवाड प्रांतात जाऊन राहिले. तिकडे राज्य स्थापन केले, ज्याचे केंद्रस्थान चितोडगड किल्ला होते असे इतिहासकार सांगतात.

पुढे परकीय आक्रमकांच्या टोळधाडी हिंदुस्थानावर कोसळल्या, त्यावेळी या मेवाडातील राजपूत राजांशी त्यांचे अनेक युद्धप्रसंग झाले. त्यानंतर इ.सन तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली, यात राजपुतांनी आपल्या बाणेदार स्वभावाचे दर्शन त्याला दाखवून दिले, त्यांनी आपल्या प्राणाची आहुतीच  रणसंग्रामात दिली. त्यांना अल्लाउद्दीनच्या प्रचंड सेनेपुढे हार पत्करावी लागली.कित्येक रजपूत प्राणांस मुकले.
याच वंशातील देवराजजी महाराणा यवनांच्या त्रासाने जेरीस येऊन त्या प्रांताचा त्याग करून दक्षिणेस आले आणि कृष्णा, भीमा नदीच्या तिराने पाळेगारी करून राहू लागले. दक्षिणेत आल्यानंतर शिसोदे वंशीय राजघराण्याचे पुढे भोसले हे आडनाव झाले. त्यांच्या वंशजांना पुढे तिथल्या गावांच्या पाटीलक्या मिळाल्या. त्याच वंशात पुढे बाबाजी भोसले यांच्या जन्म इ.सन १५३३ त झाला. बाबाजी भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती. मालोजींचा जन्म इ.सन १५५० तर विठोजींचा जन्म १५५३ त झाला. हे दोघेही कर्ते झाल्यानंतर पुढे देवगिरी जवळील वेरूळ गावी येऊन राहिले. त्यानंतर देवगिरीच्याच यादवांचे वंशज असलेलं सिंदखेडचे लखुजीराजे जाधव यांच्या पदरी नोकरी धरली. लखुजीराजे हे निजामशाही सल्तनतीचे एक मोठे सरदार होते. त्यांना निजामशाहीत बारा हजाराची मनसब असून ते सिंदखेडचे देशमुख होते.
    मालोजी राजांच्या अंगचे गुण ओळखून मूर्तिजा निजामशहाने त्यांना लष्करात शिलेदारी दिली. त्याप्रमाणे ते घरची घोडी ठेवून निजमशाहाची नोकरी करू लागले. मालोजी राजांच्या पोटी शहाजीराजे आणि शरीफजींचा जन्म झाला. इ.सन १५९४ साली शहाजी राजांचा जन्म झाला असे इतिहासकार सांगतात.
निजामशाहीत नोकरी करीत असतांनाच मालोजी राजांच्या अंगचे गुण प्रदर्शित होऊन दरबारात योग्यतेस चढून त्यांना जुन्नर, पुणे, सुपे  या भागातील परगण्यांची जहागीर मिळाली.या सर्व घडामोडी इ.सन १६०४ साली घडल्या.
निजामशाहीत कार्यरत असलेल्या लखुजी राजे जाधव आणि मालोजी राजे भोसले यांच्यात सोयरीक होऊन हे एकमेकांचे व्याही झाले, इतिहासकार सांगतात की शिमग्याच्या सणात रंगपंचमीच्या दिवशी सर्व सरदारांना भोजनास बोलावले आणि असताना जिजाऊ आणि शहाजी राजांच्या लग्नाची बोलणी झाली. इतिहासकार सांगतात की या विवाह सोहळ्यास स्वतः बादशाह निजामशहा उपस्थित होता. हा विवाह इ.सन १६०४ च्या एप्रिल महिन्यात दौलताबादेस झाला. मालोजी राजे हुशार आणि कर्तबगार असल्यामुळे त्यांचे निजामशाही दरबारात तेज पडून लागले.
मालोजी राजांना निजामशाहीत मनसब मिळाल्यानंतर शहाजी राजे आपल्या वडिलांबरोबर नेहमी दरबारात जात येत असत. शहाजी राजे हुशार, कुशाग्रबुद्धी, देखणे आणि सुशील होते, त्यामुळे दरबाराच्या लोकांची अमीरउमरावांची त्यांच्यावर मर्जी बसली. पुढे आपल्या या जहागिरीत इमानाने नोकरी करून पंधरा वर्षानंतर इ.सन १६१९ त मालोजीराजे मृत्यू पावले. त्यांच्या नंतर जहागीर आणि मनसब विठोजी राजांनी सांभाळली आणि पुढे शहाजी राजांना मिळाली.

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत. सतराव्या शतकात जन्मलेल्या या युगप्रवर्तक राजाच्या चरित्रातील कोणताही प्रसंग आपण वाचला किंवा त्यावर अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक वेळी या थोर पुरुषाची नव्यानेच ओळख होते. आता पर्यंत शिवचरित्रावर अनेक पुस्तके, ग्रंथ लिहिले गेले आहेत पण प्रत्येकाला आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून ती वाचता येतातच असे नाही.
           माझ्याकडे असलेली शिवरायांच्या जीवनावरील जी काही अल्पस्वल्प माहिती मी आपल्यापर्यंत या ब्लॉग च्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. यासाठी मी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या शिवचरित्राची मदत घेत आहे. हा ब्लॉग म्हणजे कोणत्याही प्रकारचे इतिहास संशोधन नाही तर इतिहासकारांनी केलेल्या संशोधनाची मदत घेऊन आपल्या पर्यंत शिवचरित्र पोहोचावा इतकाच माझा उद्देश आहे.
       

शिवचरित्र अभ्यासात असतांना आपण शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा त्यांच्या कार्याचा क्रमाक्रमाने अभ्यास करणार आहोत. इ. स. १००० च्या सुमारास परकीय आक्रमक हिंदुस्थानात येऊ लागले होते. संपूर्ण हिंदुस्थान भर आपली सत्ता स्थापित करायला त्यांना ५०० ते ६०० वर्ष लागली, परंतु या काळात त्यांना इथल्या स्थानिक राजांनी विरोध केला नाही असे नाही, पण यात त्यांना यश आले नाही. 
      शिवचरित्र वाचण्याआधी आपल्याला तत्कालीन राजकीय, सामाजिक,आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असणे गरजेचे आहे.
     परकीय आक्रमण भारतावर झाल्यानंतर हिंदुस्थानातील स्वदेशी राज्यकर्त्यांची सत्ता जाऊन ते या परकीयांचे मांडलिक झाले. आणि हिंदुस्थानशी किंवा इथल्या संस्कृतीशी जराही साधर्म्य नसलेल्या परधर्मीय सत्ता हिंदुस्थानावर स्थापन झाली. ही सत्ता स्थापन होण्यासाठी बराच काळ जावा लागला.
      इ. सन सहाव्या शतकाच्या शेवटी अरबस्थानात मुसलमानी धर्माची स्थापना मुहंमद पैगंबर यांनी केली. त्यानंतर आठव्या शतकात हिंदुस्थानात सत्ता स्थापनेसाठी त्यांचा प्रवेश झाला, त्यानंतर पुढे इथल्या मोठ्या भूभागावर अंमल बसवायला तीनशे वर्ष लागली. इ.सन १००० च्या सुमारास गजनवी चा महमूद हा हिंदुस्तान वर स्वाऱ्या करू लागला. त्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच मुसलमान सुलतानांच्या स्वाऱ्या झाल्या. आणि त्यानंतर सहाशे वर्षाच्या काळात सर्व देश या सुलतानांनी व्यापुन टाकला.
    पुढे इ.सन सतराव्या शतकात दक्षिण हिंदुस्थानात महाराष्ट्र म्हणून जो भाग आहे, तेथील लोकांनी स्वदेशाभिमानी वृत्ती बाळगून आणि आपल्या शौर्याच्या बळावर या परकीय सुलतानांवर मात करून इथे स्वराज्य स्थापन केले.
सतराव्या शतकातील हिंदुस्थान
     इ.सन १७ व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर हिंदुस्थानात मोगलांची सत्ता स्थापन होऊन स्थिरावली होती. मोगल बादशाहा अकबराची कारकीर्द सुरू होती, आणि त्यांनी दक्षिणेवर चढाईचे धोरण चालू ठेवले होते. सर्व हिंदुस्थानावर त्यांची एकछत्री मोगली अंमल बसवायची महत्वकांक्षा होती. दक्षिणेतील राजकीय परिस्थितीचा विचार करायचा तर आपल्याला बहामनी साम्राज्याचा विचार करावा लागतो. हे हिंदुस्थानातील दक्षिणेकडचे पहिले स्वतंत्र इस्लामी साम्राज्य होते. इ.सन १४ व्या आणि १५ व्या शतकांत अस्तित्वात असलेल्या या साम्राज्याचे मुख्य केंद्र गुलबर्गा आणि बीदर या ठिकाणी होते. अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसन गंगू बहामनी हा याचा संस्थापक होता. या बहामनी साम्राज्याचे पुढे तुकडे होऊन यातून पाच शाह्या निर्माण झाल्या, त्यापैकी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडातील इमादशाही, आणि बीदरची बरीदशाही अशा या पाच शाह्या. शिवकाळापर्यंत यापैकी तीनच शिल्लक राहिला होत्या, इमादशाही आणि बरीदशाही यांचा शेवट झाला होता.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

घाटवाटा- वरंधा घाट

फार पूर्वीपासून भारताचा विविध देशांशी जो व्यापार चालायचा, जसा भूमार्गाने चालायचा तसाच समुद्रमार्गाने सुदधा चालायचा. महाराष्ट्रात ज्या प्रसिद्ध बाजारपेठा होत्या जसे की पैठण, जुन्नर वगैरे यांच्यापर्यंत जी मालवाहतूक चाले, ती याच सह्याद्रीच्या कुशीतून ये जा करणाऱ्या घाटवाटांवरूनच केली जाई. याच मार्गाने त्याची वाहतूक चाले.

सह्याद्रीच सुंदर रूप जस नजरेत भरणारं आहे तसंच ते भीषण रौद्र सुद्धा आहे. याच दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत जसे की नाणेघाट, माळशेज घाट, वरंधा घाट,आंबेनळी घाट,फोंडा घाट,आंबोली घाट. यातील बरेच घाटमार्ग आताच्या काळात पक्के केलेले आहेत. जे आजही कोकण आणि देश यांच्यातील दुव्याचं काम करतात आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.त्यातीलच एक वरंधा घाट होय.

महाडच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्री रांगेत वरंधा घाटमार्ग आहे. या पर्वत रांगेत अनेक उंचच उंच डोंगर आहेत. महाबळेश्वर,रायरेश्वर असे एकापेक्षा एक डोंगर आहेत. या पर्वतांची सरासरी उंची ४००० फूट आहे. आंबेनळी घाटाच्या अलीकडे महाड एमआयडीसी च्या बाजूने एक रस्ता गेला आहे, हाच रस्ता वरंधा घाटात जातो. पुढे आपण वळण वळणाचा रस्ता पार केल्यावर माथ्यावर पोहोचतो. तेव्हा आपल्याला हिरव्यागार खोल दरीचे सुंदर दर्शन होते. इथल्या निसर्ग सौंदर्याची अनोखी दृश्य आपल्याला खंडाळा घाटाची आठवण करून देतात.

वरंधा घाट फारसा रहदारीचा नसला तरीही इथून दिसणारा निसर्ग मात्र आपल्या मनाला भुरळ घालतो,खासकरून पावसाळ्यात तर आपल्याला या उंचावरून दिसणाऱ्या निसर्गाची मोहिनीच पडते. अनेक ठिकाणांहून पडणारे फेसाळ धबधबे याच्या सौंदर्यात भर घालतात. घाटातील डोंगरांनी जणू धुक्याची चादर पांघरलेली असते. त्याचप्रमाणे सगळे डोंगर हिरवी शाल पांघरून बसलेले असतात. 

वरंधा घाटाचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा तितकेच आहे. अनेक ऐतिहासिक शिवकालीन किल्ले आणि ठिकाणे आपल्याला इथून दिसू शकतात. वरंधा घाटाच्या डाव्या बाजूला असाच एक किल्ला या घाटवाटेच्या रक्षणासाठी कायम उभा आहे, त्याचं नाव आहे कावळ्या किल्ला. त्याची उंची अंदाजे २००० फूट आहे.

त्याचप्रमाणे घाट मार्ग चढत असतांना वरंध गावच्या अलीकडे एक रस्ता शिवथर घळीकडे जातो. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली शिवथर घळ येथून जवळच आहे. याच ठिकाणी समर्थांनी श्रीमद दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. घाटमार्ग पार केल्यावर पुढे आपल्याला राजगड, तोरणा या किल्ल्यांची शिखरे दिसतात. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला खाली कोकणातील रायगड किल्लाही दिसतो. तसेच पुढे गेल्यावर आपल्याला रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार, कंगोरी किंवा मंगळगड किल्ला यांचे दर्शन होते.

महाड ते वरंध घाट अंतर २० किमी आहे. घाट माथ्यावर चहा-भजींची दुकाने आहेत पण राहण्यासाठी आपल्याला पुढे भोरला जावे लागते. वरंध घाट ते भोर हे अंतर ४० किमी आहे. वाटेत आपल्याला रायरेश्वर, रोहिडा, केंजळगड अशी ठिकाणे लागतात. हा सर्व प्रदेश शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे, त्यामुळे या भागाचं वैशिष्ट्य विशेष आहे.

वरंधा घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्य


सोमवार, २४ जानेवारी, २०२२

सह्याद्रीची भटकंती

घाटमाथा

महाराष्ट्राला दगडांचा देश असे म्हटले गेले आहे, त्याला कारणही तसेच आहे. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट यांच्या सारख्या विशाल पर्वत रांगा, असंख्य दुर्गम, दुर्लघ्य किल्ले, अनेक थंड हवेची ठिकाणे अशी विविधता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.



सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेला असलेल्या भूभागाला आपण कोकण म्हणून ओळखतो. भगवान परशुरामाने ही भूमी तयार केली अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
    सहयाद्री पर्वत चढून आपण वर आलो की आपण घाटमाथ्यावर येतो. सहयाद्री पर्वताची सरासरी उंची आहे अडीच हजार ते साडेतीन हजार फूट, सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई त्याची उंची साडेपाच हजार फूट आहे. कळसुबाई हे शिखर बालाघाट डोंगररांगेत आहे. तसेच हरिश्चंद्र, आजोबा डोंगर,अलंग, कुलंग, मदन असे विशालकाय शिखर या रांगेत आहेत. महाराष्ट्रात ट्रेकिंग, फोटोग्राफी तसेच निसर्गाची आवड असलेली भटकी मंडळी आपल्याला या भागात फिरतांना आढळतात.
   सह्याद्रीतील बहुतेक घटमाथे हे किल्ल्यांनी तसेच थंड हवेच्या ठिकाणांनी सजलेले आहेत. या प्रत्येक डोंगर माथ्यावरून आपल्याला अतिशय नेत्रसुखद असे दृश्य पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर इथल्या निसर्ग सौंदर्यात विलक्षण भर पडून आपल्याला इथल्या निसर्गाची भुरळ पडते. सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली असते. मधेच धुकं बाजूला होऊन या डोंगरांवरून वाहणारे दुधाळ धबधबे आपल्याला दर्शन देतात.
डोंगरमाथ्यावर किंवा घाटमाथ्यावर जाण्यासाठी असलेले प्राचीन घाटमार्ग सुद्धा आकर्षणाचे विषय आहेत. पूर्वीच्या काळात भारतीय व्यापाऱ्यांचे परदेशातील लोकांशी जे
व्यापार चालत ते बहुधा समुद्रमार्गानेच चालत असत आणि मालाचं दळणवळण करण्यासाठी काही घाटमार्ग तयार केलेले असत. त्या घाटमार्गाच्या मदतीनेच बंदरातील माल देशावरील पैठण, जुन्नर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला जाई. कोकणातून देशावर जाणाऱ्या घाट मार्गात प्रामुख्याने  बोरघाट, थळघाट, माळशेज घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट, नाणे घाट हे आहेत. या पैकी बरेचशे पायवाट म्हणून सुद्धा देशावरून कोकणात किंवा कोकणातून देशावर जाण्यासाठी वापरत.
   

रविवार, २३ जानेवारी, २०२२

झाडे आपल्याच मदतीसाठी

औदुंबर-उंबर

उंबराच्या झाडाला खोडाला आलेली फळे


विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.

अशा प्रकारे आपल्या धर्मशास्त्रात या  झाडाचं विशेष महत्व सांगितलं जातं. याचं शास्त्रीय नाव Ficus Racemosa असं आहे. हे झाड ४५ ते ५० फूट वाढतं, याच्या खोडाचा रंग फिकट पांढरा असतो याची फळे खोडाच्या जवळ झुपक्यांनी येतात. 

औषधी उपयोग

या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

जीवशास्त्रीय रचना

उंबर किंवा औदुंबर हा मुख्यतः भारतश्रीलंकाम्यानमारऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.

वैशिष्टे व वापर

उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.

याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.

सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.  रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...