Wikipedia

शोध परिणाम

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

शाहजी राजे मोगलांकडे....

 शहाजहानला शाहजी राजांच्या युद्धकुशल गुणांची ओळख होतीच. शिवाय निजामशाही बुडवण्यासाठी आपल्याला शाहजी राजांसारख्या नेतृत्वाची मदतच होईल असे समजून त्याने शाहजी राजांना पाच हजाराची मन्सब आणि निजामशाही कडून त्यांना आधी मिळालेला मुलुख कायम केला. या सगळ्या घडामोडी इ सन १६३० त घडल्या. अशाप्रकारे शाहजी राजे मोगलांच्या नोकरीत गेले. पुढे अशी काही कारणे घडली की त्यांनी मोगलांची नोकरी सोडली आणि पुन्हा स्वतंत्र अंमल चालवून राहिले.



        या सगळ्या काळात निजामशाही दरबारात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. निजामशाही मुलुखात सारख्या मुघलांच्या धामधुमी चालू असल्यामुळे आणि या काळात दुष्काळ, रोग वगैरे आल्यामुळे सरकारी वसूलात मोठी कमी आली होती.  शिवाय मोगलांनी आपल्या मोठ्या मोठ्या सरदारांना फितवुन आपल्या बाजूने वळवुन निजामशाही खिळखिळी करुन सोडली होती. याच सगळ्या गदारोळात निजामशहा बादशाहने आपल्यावर आलेल्या या संकटाना आपला वजीर तकरीबखान कारणीभूत आहे असे समजून त्याला पदावरून कमी करून कैदेत टाकले. आणि फत्तेखानाला कैदेतून सोडून पुन्हा वजीर पद दिले. अशाप्रकारे निजामशाही दरबारात अधिकारांतर झाले.
     फत्तेखानाच्या हातात पुन्हा अधिकार आल्यावर त्याने पूर्वग्रह मनात ठेवून निजामशहास वेड लागल्याचे पसरवून त्याला लवकरच गळफास देऊन ठार मारले. त्याचा दहा वर्षाचा मुलगा त्याने गादीवर बसवला. त्याने निजामशहाच्या पक्षास असलेल्या सरदारांची सुद्धा कत्तल केली. या सगळ्या घटना इ सन १६३२ त घडल्या.
     यानंतर त्याने शहाजहान बादशहास आपण मुघलांचे अंकित होऊन राहू इच्छित आहोत असे पत्र पाठवले. शहाजहानला त्याचा मनसुबा लक्षात आला यावेळी बरेच  निजामशाही परगणे त्याच्या ताब्यात आले होते. त्यामुळे त्याने असा निरोप पाठवला की, निजामशाही खजिन्यातील सर्व मूल्यवान जवाहीर आणि उत्तम हत्ती आमच्याकडे पाठवा. तरच तुम्हाला आणि तुमच्या बालराजाला  मान्यता देऊ आणि काही मुलुख जहागिरी दाखल देऊ तेव्हा ही मागणी फत्तेखानाला मान्य झाली नाही, त्याप्रमाणे शहाजहानने त्याच्यावर सैन्य पाठवले. तेव्हा घाबरून जाऊन फत्तेखानाने त्याचे म्हणणे मान्य केले.आणि त्याप्रमाणे फत्तेखानाला जहागीर मिळाली. या जहागिरीत शाहजी राजांचा पूर्वीचा मुलुख होता, त्यामुळे मोगलांचा हा निर्णय त्यांना पसंत वाटला नाही, त्यामुळे त्यांनी मोगलांची नोकरी न करता स्वतंत्र होण्याचा विचार  केला ,त्याप्रमाणे त्यांनी निजामशाहीतील मुलुख नाशिक,त्र्यंबक,संगमनेर,जुन्नर,उत्तर कोकणचा काही भाग आपल्या कब्जात आणायला सुरुवात केली.
    हे सर्व घडत असताना शाहजी राजांनी मुरार जगदेवाशी बोलणे करून आदिलशहास आपल्या बाजूने करून घेतले आणि निजामशाहीतील मुलुख आणि किल्ले घेण्यासाठी त्यांच्या सैन्याची मदत मिळवली. अशाप्रकारे शाहजी राजे आणि मुरार जगदेव हे दोघे 
दौलताबादच्या किल्ल्यावर चालून गेले. हे चालून गेलेले पाहून फत्तेखानाने मुगलांचा सुभेदार मोहबतखान याला मदतीला बोलावले त्याप्रमाणे त्याची कुमक फत्तेखानाला मिळाल्याने किल्ला यांना लढून जिंकता येईना. मग त्यांनी भेद करून किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केले आणि फत्तेखानाला आपल्या बाजूने केले त्याप्रमाणे फत्तेखानाने मोगलांशी डाग करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे विजापूरकर आणि शाहजी राजे आणि किल्ल्यावरून फत्तेखान यांनी एकत्र मुघलांच्या छावणी वर हल्ला केला. पण मुघलांपुढे यांची एकही न चालून किल्ला मुघलांनी काबीज केला. याप्रमाणे फत्तेखानाला मुघलांनी शरण आणून त्यांने बसवलेल्या बालराजला कैदेत टाकून निजामशाही खालसा केल्या प्रमाणे झाले. या सर्व घडामोडी इ. सन १६३३ त घडले. यावेळी निजामशाही पूर्ण नष्ट केली असे जरी शहाजहानास वाटत असले तरी पुढे लवकरच शाहजी राजांनी तीची पुनर्स्थापना केली.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...