निजामशाहीतील नोकरी
| फर्जंद शहाजी राजे |
निजामशाही सैन्याला मराठा सरदारांची चांगलीच साथ असलेली पाहून शाहजहानाने त्यांच्यात फितुरी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मलीक अंबाराशी ज्यांचे पटत नव्हते ते फितूर झाले. शहाजी राजांचे सासरे लखुजीराजे सुद्धा मोगलांना सामील झाले. पण शहाजी राजांनी निजामशाहीचा पक्ष सोडला नाही. या सगळ्या घडामोडीत निजामशाही मुलुख मोगलांनी घेतला तर शाहजहान दिल्लीस गेल्यावर त्याच्या कबज्यातील मुलुख मलीक अंबरने पुन्हा जिंकून घेतला अशी धुमश्चक्री चालू होती. पण पुढे मलीक अंबरने मोगलांशी लढाई करून मुलुखात शांतता राखण्यासाठी मोगलांशी संधी केली. त्या नंतर मोगल आणि निजामशाहीत फार जास्त लढाई झाली नाही. पुढे इ.सन १६२६ त आजाराचे काही कारण होऊन मलीक अंबर मृत्यमुखी पडला.
मलीक अंबरच्या मरण पावल्यावर बादशाह जहांगीरच्या नंतर तख्तावर बसणार शहाजहान याने लखुजी जधावरावांच्या मदतीने निजामशाही संपूर्ण संपविण्याचा घाट घातला.मलीक अंबर याच्या मृत्यू नंतर मुर्तुजा निजामशहाच्या आईला विश्वासात घेऊन निजामशाही कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि पुढे मोगली फौजा दौलताबाद कडे आल्यावर। मूर्तिजा निजामशहा आणि त्याच्या आईला त्यांनी कोकणात कल्याण जवळील माहुली किल्ल्यात नेऊन ठेवले. या किल्याला मोगली सैन्याचा गराडा पडला पण शहाजी राजांनी त्यांना जरासुद्धा दाद लागू दिली नाही. पण पुढे लखुजीराजांनी निजामशहाच्या आईस वश करून मिलाफाचे बोलणे लावले. त्यामुळे शाहजी राजांना फार वाईट वाटून त्यांनी किल्ल्यातुन निघून जाण्याचा विचार केला आणि ते वेढा फोडून बाहेर माहुली किल्ल्याच्या बाहेर पडले.
शहाजी राजे माहुली किल्ल्यातुन बाहेर पडून देशाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सोबत जिजाबाई आणि मुलगा संभाजी हे दोघेही होते. संभाजी यावेळी तीन चार वर्षाचे होते. जिजाबाई तेव्हा सात महिन्यांच्या गरोदर होत्या. या घोडदौडीमध्ये जिजाबाईंना धावपळीचा त्रास होऊन वेदना होऊ लागल्याने त्यांना शहाजी राजांनी सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी जुन्नर भागात असलेल्या शिवनेर किल्ल्यावर यांचे ठाणे होते. शहाजी राजे आणि यांचे सख्य होते. त्यामुळे जिजाबाई आणि संभाजी यांना काही निवडक माणसे सुरक्षेसाठी ठेऊन शहाजी राजे पुढे निघून गेले.
दरम्यान जाधवराव वगैरे लोक तिथे आल्यावर त्यांची आपल्या मुलीशी जिजाबाईशी भेट झाली. लखुजी रावांनी त्यांना आपल्या सोबत येण्याविषयी विचारले असता त्यांनी तिथेच राहण्याबद्दल सांगितले. आणि आपल्या पतीच्या विश्वासावर तिथेच राहण्याचा निर्धार केला. जाधवराव सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी काही माणसे ठेऊन स्वतः तिथून शहाजी राजांच्या पाठलागावर निघाले.
शहाजी राजे यावेळी निसटले ते थेट विजापूरच्या वाटेवर. यावेळी मुरार जगदेव आणि रणदुल्लाखान हे विजापूर दरबारातील मोठर सरदार होते. शहाजी राजांच्या निजामशाही बुडू न देण्याच्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा होता. या दोघांना शहाजी राजांची योग्यता चांगलीच माहिती होती.