मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजे माहुली किल्ल्यातून सुटून आदिलशाही सरदार रणदुल्लाखान आणि मुरार जगदेव यांच्या मदतीने राहिले. ते परिंडा किल्ला आणि आजूबाजूचा मुलुख आपण हस्तगत करून स्वतंत्र पणे राहिले. दरम्यान निजामशाहीचा वजीर असलेला मुत्सद्दी मलीक अंबर मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा फत्तेखान हा वजीर झाला. फत्तेखान हा मलीक अंबरचा पुत्र जरी असला तरी बापासारखा धोरणी किंवा हुशार नसून गर्विष्ठ आणि क्रूर होता. मोठ्या मोठ्या सरदारांना वागवून घेण्याची आपल्या बापाची पद्धत त्याच्यामध्ये बिलकुल नव्हती. यानेसुद्धा मोगलांशी काही वेळ युद्ध चालवले पण त्यात त्याला यश आले नाही आणि मोगलांचा सरदार खानजहान लोदी याच्याशी त्याने तह करून मुलुखात शांतता राहील असे प्रयत्न केले. त्यामुळे निजामशाहीचा थोडा वेळ निभाव लागला होता.
दरम्यान मूर्तिजा निजामशहाला फत्तेखानाचा शिरजोरपणा सहन न होऊन त्याने त्याला अधिकार पदावरून बाजूला करून तकरिबखानाला वजिरी दिली आणि फत्तेखानाला कैदेत केले. यानंतर निजामशाहीत अधिकारांतर झाले आणि हे पाहून लखुजी जाधवरावांनी पुन्हा निजामशाहीत येण्याविषयी बोलणे लावले. तेव्हा मूर्तिजा निजामशाहाने त्यांचे बोलणे प्रत्यक्ष ऐकायचे आहे असे सांगून त्यांना दरबारात भेटायला बोलावले, त्याप्रमाणे ते आणि त्याचा मुलगा अचलोजी असे दोघे (काही इतिहासकार सांगतात की त्यांचा अजून एक मुलगा आणि नातू या हल्ल्यात मारले गेले) दरबारात गेले. परंतु मूर्तिजा निजामशहा हा खुनशी मनुष्य असल्याकारणाने त्याने त्यांच्या मागच्या गोष्टींचा सूड म्हणून आधीच ठरविल्याप्रमाणे दरबारातुन उठून जाऊन त्यांचा खून करवला.
आपल्या सासऱ्याला दग्याने असे ठार मारल्याचे वर्तमान शाहजी राजांना कळले तेव्हा ते परींडा किल्ल्यात होते. त्यांच्यात आणि जाधवरावांच्यात वैर जरी असले तरी त्यांचा अश्या पद्धतीने खून झाल्याने शाहजी राजांना फार दुःख झाले. दरम्यान त्यांनी संगमनेर पासून ते पुण्यापर्यंतचा सगळा मुलुख आणि किल्ले आपल्या कब्जात आणून स्वतंत्र अंमल चालविला होता. निजामशहा हा खुनशी आणि घातकी मनुष्य आहे त्यामुळे त्याच्याशी सख्य करून आपले नुकसान होईल हे त्यांना कळले होते. वर सांगितलेल्या धामधुमीत त्यांनी विजापुरी मुलुखावर सुद्धा हल्ले केले करून त्यांचा काही भाग काबीज केला होता. त्यामुळे आदिलशाही दरबारात घडामोडी होऊन त्यांनी मुरार जगदेवाला मोठे सैन्य देऊन शाहजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले . शाहजी राजांकडे या तेव्हा मोठ्या सैन्याशी लढता येईल अशी ताकद नव्हती. त्यामुळे ते आजूबाजूच्या मुलुखात पळत राहिले. मुरार जगदेवाने पुणे, इंदापूर वगैरे राजांच्या मुलुखात जाळपोळ सुरु केली आणि मुलुख बेचिराख करून टाकला . पुढे ही वावटळ शांत झाल्यावर शाहजी राजे पेमगडावर जाऊन राहिले. तिथे राहून त्यांनी सैन्याची पुन्हा जमवाजमव करून हातचा गेलेला मुलुख आणि किल्ले परत मिळवले. दरम्यान मोगलांचा सरदार खानजहान लोदी हा मुघल बादशाहची इतराजी होऊन दक्षिणेत येऊन निजामशहाच्या मदतीने राहिला होता. निजामशाहीतील देशमुख आणि जहागिरदारांनी त्याच्या बाजूने लढून मोगलांशी युद्ध सुरू केले होते. पुढे शहाजहान ने मोठी फौज पाठवून खानजहान लोदी सह निजामशहास नमवले. हे मोगली वावटळ इथून पुढे आपल्यावर येणार हे ओळखून शाहजी राजांनी मोगलांना त्यांच्याकडे नोकरी करण्याची तयारी असल्याचे कळवले.