मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं कि, शहाजहानने इ. सन १६३३ त निजामशाही राज्य जिंकण्यासाठी मोहबतखानाला निजामशाहीवर फौज घेऊन पाठवले. त्याप्रमाणे फत्तेखानाला नमवून आणि त्यांच्या कब्जातील मुलुखावर विजय मिळवून मोगली फौजा शांत झाल्या. दरम्यान या मोहिमेत शाहजी राजांनी मोगली फौजेवर वेळोवेळी छापे घालून त्यांना हैराण करून सोडले आणि विजापूरकर सैन्यासोबत शाहजी राजांना सुद्धा हार खावी लागली.
| शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम(शाहजहान) |
मागे सांगितल्या प्रमाणे शाहजी राजे आणि विजापूरकरांच्या फौजा हार घेऊन दौलताबादेतून मागे फिरल्या. त्यांच्या सोबत परत येताना शाहजी राजांनी पराभवाने खचून न जाता आपल्या हातातील सैन्य जमवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मोगलांच्या ताब्यात गेलेला पुणे, चाकण, बालाघाट पर्यंतचा प्रदेश कब्जात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मोगलांची अनेक ठाणी उठवली. याच सुमारास शाहजी राजांनी विचार केला की, मोगलांनी घेतलेला मुलुख आपण पुन्हा घेतला तेव्हा आपल्यावर आता लवकरच त्यांची मोहीम होईल, त्यानुसार त्यांनी विजापूरकर आदिलशाही दरबारातील रणदुल्लाखान आणि मुरार जगदेव यांच्या मदतीने दरबाराचा पाठिंबा मिळवला. यानंतर त्यांनी निजामशाहीचा एक वंशज मूर्तिजा नावाचा दहा वर्षाचा मुलगा गादीवर बसवला आणि आपण स्वतः या राज्याचे वजीर झाले. यामुळे निजामशाही घराण्याचा अभिमान बाळगणारे सर्व देशमुख, जहागीरदार,वतनदार शाहजी राजांना सामील झाले. पुढे शाहजी राजांनी निजामशाही चा जो प्रदेश मोगलांनी घेतलेला तो आपण हस्तगत केला. या सगळ्या प्रसंगाची खबर शाहजहान ला लागताच त्याने शाहजीराजांचा बिमोड करण्यासाठी फौज पाठवली पण तिचा शाहजी राजांनी पार धुव्वा उडवला नंतर त्याने दुसरे सैन्य पाठवले त्याचीही तीच अवस्था झाली. यानंतर शहाजहानच्या लक्षात आलं की आपला निजामशाही बुडवल्याचा भ्रम होता, उलट पूर्वीच्या शत्रूपेक्षा अधिक बळकट शत्रूशी आता आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे चिडून जाऊन शहाजहानने ठरवले की आता शाहजी राजांना आणि आदिलशाह, कुतुबशहा या यावनी राज्यांचा सुद्धा बिमोड करायचा. त्यानुसार तो पिसाळलेल्या चित्त्याप्रमाणे दक्षिणेवर चालून आला.