Wikipedia

शोध परिणाम

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

घाटवाटा- वरंधा घाट

फार पूर्वीपासून भारताचा विविध देशांशी जो व्यापार चालायचा, जसा भूमार्गाने चालायचा तसाच समुद्रमार्गाने सुदधा चालायचा. महाराष्ट्रात ज्या प्रसिद्ध बाजारपेठा होत्या जसे की पैठण, जुन्नर वगैरे यांच्यापर्यंत जी मालवाहतूक चाले, ती याच सह्याद्रीच्या कुशीतून ये जा करणाऱ्या घाटवाटांवरूनच केली जाई. याच मार्गाने त्याची वाहतूक चाले.

सह्याद्रीच सुंदर रूप जस नजरेत भरणारं आहे तसंच ते भीषण रौद्र सुद्धा आहे. याच दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत जसे की नाणेघाट, माळशेज घाट, वरंधा घाट,आंबेनळी घाट,फोंडा घाट,आंबोली घाट. यातील बरेच घाटमार्ग आताच्या काळात पक्के केलेले आहेत. जे आजही कोकण आणि देश यांच्यातील दुव्याचं काम करतात आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.त्यातीलच एक वरंधा घाट होय.

महाडच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्री रांगेत वरंधा घाटमार्ग आहे. या पर्वत रांगेत अनेक उंचच उंच डोंगर आहेत. महाबळेश्वर,रायरेश्वर असे एकापेक्षा एक डोंगर आहेत. या पर्वतांची सरासरी उंची ४००० फूट आहे. आंबेनळी घाटाच्या अलीकडे महाड एमआयडीसी च्या बाजूने एक रस्ता गेला आहे, हाच रस्ता वरंधा घाटात जातो. पुढे आपण वळण वळणाचा रस्ता पार केल्यावर माथ्यावर पोहोचतो. तेव्हा आपल्याला हिरव्यागार खोल दरीचे सुंदर दर्शन होते. इथल्या निसर्ग सौंदर्याची अनोखी दृश्य आपल्याला खंडाळा घाटाची आठवण करून देतात.

वरंधा घाट फारसा रहदारीचा नसला तरीही इथून दिसणारा निसर्ग मात्र आपल्या मनाला भुरळ घालतो,खासकरून पावसाळ्यात तर आपल्याला या उंचावरून दिसणाऱ्या निसर्गाची मोहिनीच पडते. अनेक ठिकाणांहून पडणारे फेसाळ धबधबे याच्या सौंदर्यात भर घालतात. घाटातील डोंगरांनी जणू धुक्याची चादर पांघरलेली असते. त्याचप्रमाणे सगळे डोंगर हिरवी शाल पांघरून बसलेले असतात. 

वरंधा घाटाचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा तितकेच आहे. अनेक ऐतिहासिक शिवकालीन किल्ले आणि ठिकाणे आपल्याला इथून दिसू शकतात. वरंधा घाटाच्या डाव्या बाजूला असाच एक किल्ला या घाटवाटेच्या रक्षणासाठी कायम उभा आहे, त्याचं नाव आहे कावळ्या किल्ला. त्याची उंची अंदाजे २००० फूट आहे.

त्याचप्रमाणे घाट मार्ग चढत असतांना वरंध गावच्या अलीकडे एक रस्ता शिवथर घळीकडे जातो. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली शिवथर घळ येथून जवळच आहे. याच ठिकाणी समर्थांनी श्रीमद दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. घाटमार्ग पार केल्यावर पुढे आपल्याला राजगड, तोरणा या किल्ल्यांची शिखरे दिसतात. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला खाली कोकणातील रायगड किल्लाही दिसतो. तसेच पुढे गेल्यावर आपल्याला रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार, कंगोरी किंवा मंगळगड किल्ला यांचे दर्शन होते.

महाड ते वरंध घाट अंतर २० किमी आहे. घाट माथ्यावर चहा-भजींची दुकाने आहेत पण राहण्यासाठी आपल्याला पुढे भोरला जावे लागते. वरंध घाट ते भोर हे अंतर ४० किमी आहे. वाटेत आपल्याला रायरेश्वर, रोहिडा, केंजळगड अशी ठिकाणे लागतात. हा सर्व प्रदेश शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे, त्यामुळे या भागाचं वैशिष्ट्य विशेष आहे.

वरंधा घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्य


सोमवार, २४ जानेवारी, २०२२

सह्याद्रीची भटकंती

घाटमाथा

महाराष्ट्राला दगडांचा देश असे म्हटले गेले आहे, त्याला कारणही तसेच आहे. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट यांच्या सारख्या विशाल पर्वत रांगा, असंख्य दुर्गम, दुर्लघ्य किल्ले, अनेक थंड हवेची ठिकाणे अशी विविधता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.



सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेला असलेल्या भूभागाला आपण कोकण म्हणून ओळखतो. भगवान परशुरामाने ही भूमी तयार केली अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
    सहयाद्री पर्वत चढून आपण वर आलो की आपण घाटमाथ्यावर येतो. सहयाद्री पर्वताची सरासरी उंची आहे अडीच हजार ते साडेतीन हजार फूट, सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई त्याची उंची साडेपाच हजार फूट आहे. कळसुबाई हे शिखर बालाघाट डोंगररांगेत आहे. तसेच हरिश्चंद्र, आजोबा डोंगर,अलंग, कुलंग, मदन असे विशालकाय शिखर या रांगेत आहेत. महाराष्ट्रात ट्रेकिंग, फोटोग्राफी तसेच निसर्गाची आवड असलेली भटकी मंडळी आपल्याला या भागात फिरतांना आढळतात.
   सह्याद्रीतील बहुतेक घटमाथे हे किल्ल्यांनी तसेच थंड हवेच्या ठिकाणांनी सजलेले आहेत. या प्रत्येक डोंगर माथ्यावरून आपल्याला अतिशय नेत्रसुखद असे दृश्य पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर इथल्या निसर्ग सौंदर्यात विलक्षण भर पडून आपल्याला इथल्या निसर्गाची भुरळ पडते. सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली असते. मधेच धुकं बाजूला होऊन या डोंगरांवरून वाहणारे दुधाळ धबधबे आपल्याला दर्शन देतात.
डोंगरमाथ्यावर किंवा घाटमाथ्यावर जाण्यासाठी असलेले प्राचीन घाटमार्ग सुद्धा आकर्षणाचे विषय आहेत. पूर्वीच्या काळात भारतीय व्यापाऱ्यांचे परदेशातील लोकांशी जे
व्यापार चालत ते बहुधा समुद्रमार्गानेच चालत असत आणि मालाचं दळणवळण करण्यासाठी काही घाटमार्ग तयार केलेले असत. त्या घाटमार्गाच्या मदतीनेच बंदरातील माल देशावरील पैठण, जुन्नर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला जाई. कोकणातून देशावर जाणाऱ्या घाट मार्गात प्रामुख्याने  बोरघाट, थळघाट, माळशेज घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट, नाणे घाट हे आहेत. या पैकी बरेचशे पायवाट म्हणून सुद्धा देशावरून कोकणात किंवा कोकणातून देशावर जाण्यासाठी वापरत.
   

रविवार, २३ जानेवारी, २०२२

झाडे आपल्याच मदतीसाठी

औदुंबर-उंबर

उंबराच्या झाडाला खोडाला आलेली फळे


विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.

अशा प्रकारे आपल्या धर्मशास्त्रात या  झाडाचं विशेष महत्व सांगितलं जातं. याचं शास्त्रीय नाव Ficus Racemosa असं आहे. हे झाड ४५ ते ५० फूट वाढतं, याच्या खोडाचा रंग फिकट पांढरा असतो याची फळे खोडाच्या जवळ झुपक्यांनी येतात. 

औषधी उपयोग

या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

जीवशास्त्रीय रचना

उंबर किंवा औदुंबर हा मुख्यतः भारतश्रीलंकाम्यानमारऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.

वैशिष्टे व वापर

उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.

याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.

सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.  रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...